लेख

सृष्टीशी माझे नाते

(येथे माणूस आपले आत्मवृत्त कथन करत आहे, तो सृष्टी आणि त्याच्या नात्यातला गोडवा, प्रेम आणि राग व्यक्त करत आहे.)  

“बा आदब, बा मुलाहिजा, होशियार” अशी आगमनाची वार्ता मी घरात देऊन सृष्टीचे स्वागत केले होते.

माझं आणि सृष्टीचं नातं तसं फार पूर्वीचंच…! तशा आमच्यातल्या गोष्टी खाजगी आहेत खर्‍या पण आज व्यक्त होतोय कारण म्हणतात ना, भीती दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या गोष्टी सर्वांसमोर मांडण.

होय खर आहे, तिच्यात आणि माझ्यात  खूप मोठं भांडण झालय.

व.पु. म्हणतात ते खरचं आहे, “बायकांची प्रेम करायची तर्हाच वेगळी; स्वत:ची पत, सामाजिक प्रतिष्ठा, लौकिक, स्वास्थ्य ह्या सगळ्याला धक्का न लावता एखादं प्रेमप्रकरण त्यांना पंचपक्वानांच्या जेवणानंतर एखाद्या विड्यासारखं चघळायला हवं असतं.”

आणि हो माझ्याबरोबरच्या छोट्याशा प्रसंगाची कथा करून आपल्या मैत्रिणीला सांगायची हिची धडपड मात्र खरचं अजब आहे बरं का,

एकदा झालं अस की, ती आणि मी बाहेर फिरायला गेलो होतो जाता जाता पवन भेटला. दोघांचं काहीतरी बोलणं सुरू होतं मी आपला नेहमीप्रमाणे गप्पच होतो, बोलणं संपता संपता पवनचा राग अनावर झाला आणि तो तिथून ताडकन निघून गेला, मी सृष्टीला काय झालंय विचारणार इतक्यात वर्षा तिथे रडत रडत आली. तिने एवढा राडा केला, एवढा राडा केला ना की बासच मग या दोघींचं चालू झालं, मग माझ मी तिथून निघून घरी आलो, आता मला सांगा तिथे त्या दोघींच्या संवादात मी पडून काय करणार होतो ? या इतक्या साध्या गोष्टीचा तिने घरी आल्यावर आकांड तांडव केला, म्हणली, “तू मला तिथे सोडून आलासच कसा ?”

शेवटी मग काय, ‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यानपैकी माणूस एकांतलाच जास्त घाबरतो शेवटी मी, माफी मागून त्या वादाचा ‘अंत’ केला.

हा पण मी काय भिऊन वगैरे नाही काय तिला माघार घेतली, ते असच त्या “वर्षा”मुळे माघार पत्करावी लागली, कारण सृष्टीच्या बर्‍यावाईट दिवसात तिचाच मोलाचा वाटा होता ना !

अहो, ती जशी आणि ज्यापद्धतीने येते ना, त्यामागे तिचा फक्त सगळ्यांची धांदल उडवून देण्याचा उद्येष्य असावा अस वाटतय मला तर.असो तिचं महत्व पण तसचं आहे, धांदल उडवून देणारं हेही मान्य करायलाच हवं. बिरबलानं २७-९=० म्हटलं ते वर्षाराणीच्या कर्तुत्वावरूनच की !

सृष्टीचे बंधु म्हणजे “ग्रीष्मराज”, नऊ नक्षत्र पावसाची कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! आणि एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच की. तिचा रुबाब तो कसा ? मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुतार्‍या फुंकत तिचं दिमाखदार आगमन होतं. सार्‍या आसमंतात मृदगंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्षवेली अंग झटकून चैतण्यांनं फुलू लागतात, आनंदांने डुलू लागतात. कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन तृप्तीचा हुंकार देतात. घामाजलेली वसुंधरा हो, सृष्टीची आईच ती, सचैल स्नान करते आणि स्नानानंतर हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसतात त्या. घरांच्या छपरावर होणारी टप् टप् कृषीराजाला गंधर्व किन्नरांचे स्वर वाटू लागतात.

अशी ही वर्षाराणी !

पण. . . हीच वर्षाराणी रुसली तर मात्र तोंडच पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. याचं उत्तम उदाहरण माझ्याशिवाय कोण असणार ?

म्हणून मी माघार घेतली बरं का ?

सृष्टी आणि मी तसे खूप चांगले मित्र-मैत्रीण ! मी तिला प्रपोज केलंय खर, पण तिच्याकडून स्पष्टोक्ती व्हायची आहे. तिने मला एकच प्रश्न विचारला आहे की,

“तुला माझे महत्व किती आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस, ते सिद्ध कर, मी लगेच हो म्हणते.”

मी म्हणलो “असे कसे शक्य आहे ?

त्यावर ती म्हणाली, मी केल नाही का सिद्ध ?

“माझ्या सौंदर्याची, लयलूट केली नाहीस तू? तू रस्ता विसरल्यावर महासागराच्या मध्यावर ध्रुवतारा बनून तुला दिशा कोण दाखवली रे ?खारे वारे, मतलई वारे, महासगरातील बेटे, जलप्रवाह यावर नौदल चालतं हेही मीच शिकवलं ना तुला ? शास्त्रापेक्षाही मोहक अशा तुझ्या मनाची आंदोलनं स्वीकारून त्यांना कवितेतून  व्यक्त करायला मीच शिकवलं ना रे ? सूर्याची आर्जवं करणारी पृथ्वी प्रेमिकांचं प्रतीक तर खळाळणारा निर्झर बालमनाचं प्रतीक, राग, लोभ, मोह सारं सारं कोण बिंबवलं रे तुझ्या मनात ?”  

हे सार ऐकलं आणि मी निरुत्तरच झालो.

मी तिला म्हणालो, “हो पटतंय सार तुझ, कल्पनेचं इवलस बिजच कर्तुत्वाच विशाल विश्व उभ करत असतं हे तुझ्याकडूनच मी शिकलोय, मान्य आहे मला पण समृद्धीच्या लाटांवरून चालताना तुझा हात हातात घेण्याची माझी कल्पना चुकीची आहे का ? तुझ्या जिज्ञासेतून मिळालेल्या ज्ञानातूनच विकासाच्या वाटा तयार करत आहे ग मी, हे माझ चुकल का ?”

त्यावर ती म्हणाली,

“होय तू चुकलास, अरे. . .

चन्दनाला विळखा घालणारे साप तुला संस्कृत सुभाषित शिकवतात ना? तेच चन्दन तू तोडून त्यातून लक्ष्मीचं स्वागत करतोस तू, हे पटते का तुला ? अरे भौतिक शास्त्राची रुक्ष इमारत माझ्याच सिद्धांतावर आता उभी आहे, झाडावरून पडलेले फळ तुला गुरूरुत्वाकर्षण शिकवून गेले. अशा आणि नानाविध शिकवणीतूनच तुझ्या भौतिक सुखाची रेलचेल झाली, आणि तुझ्या प्रगतीचा अश्वमेध पृथ्वी प्रादाक्रांत करून चंद्रावर स्वारी करून तू मंगळवार झेपावलास.

थोडक्यात काय तर – माझ्या चारित्र्याचा उपयोग करून तू तुझे चरित्र घडवलेस?

बरोबर ?

पण अरे हे सगळ साध्य करताना “माझ्या शरीराची, मनाची होणारी ससेहोलपट तुला दिसली नाही का रे ? तू तर माझ्या चिंतेला चितेकडे घेऊन गेलास रे, आणि स्वत: मात्र चिंतन करून चैतन्याकडे जाण्याची स्वप्नं पाहत आहेस. तू तुझ्या बुद्धिमत्तेवर नव्हे तर माझ्या अमर्याद वापरावर यशवंत झाला आहेस हे लक्षात ठेव.”

हे तिचे शेवटचे बोल होते माझ्यासाठी. .

तिथून पुढे ती मला परत भेटली नाही, भेटली ती २००४ ला सुनामी बरोबरच आणि २०१३ ला उत्तराखंड मध्ये महाप्रलय सोबत घेऊन आली तेव्हाच. अजूनही तिचा रोश कायम आहे, तापमान वाढ, अवेळी अतिवृष्टी हे सर्व तिच्या रागामुळेच ! मला तिला एवढच सांगायच आहे की,

माझ काय चुकलं ते कळलंय मला पण असं रागावून त्रास करून घेऊ नकोस, मला माहितीये की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे,आपल्या नात्यातला गोडवा अजूनही अबाधित आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग, प्लीज मला माफ कर… प्लीज….!

Leave a Reply