लेख

माणसांच्या गर्दीत माणुस शोधतो मी

“घेता किती घेशील दो कराने ?”

अशा नकारात्मक भूमिकेच्या वाक्याचा वारंवार उच्चार करण्याची “कुसंधी” आज मानवावर येऊन ठेपली आहे. कारणही तसंच आशयास्पद, लाजिरवाण आहे. “माणूस नावाने संबोधल्या जाणार्‍या शरीरांची प्रचंड वाढ.”(थोडक्यात काय ? – “जनसंख्यावाढ”) तर या (लोकसंख्या) वाढीचे कारण मला असे वाटते की, “आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे धार्मिक संस्कार आहेत. त्यातच वडीलधार्‍या माणसांना वाकून नमस्कार करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, आणि पुरूषांना ‘चिरंजीव भाव !’ अन स्त्रीला ‘अष्टपुत्रा सौभग्यवती भव !’ असा आशीर्वाद देण्याचा प्रघात आहे. म्हणूनच, ‘पुत्रपौत्राण धान्यम धनं हस्त्यश्वा दिगवरथम’ अशी देवाकडे मागणी केली जाते. आणि उदार पर्मेश्वरानेदेखील प्रसन्न होऊन असाच वर दिलेला दिसतो.”

पण यात अप्रत्यक्षपणे दोष कुणाचा ? माणसाचाच ना ? मग – ‘घेता किती घेशील दो कराने ?’ असा प्रश्न विचारणे साहजिकच योग्य आहे ना ? अस म्हणतात ना की,

“Man Is Social Animal”

माणूस शेती करू लागला. घरे बांधून ‘एकत्र’ राहू लागला, तेव्हा ‘गावं’ जन्माला आली, ‘माणूस’ आणि ‘माणुसकी’ की कल्पनाही तेव्हाच जन्माला आली. पुढं गावं मोठी होऊन ‘शहरं’ बनली तेव्हा ‘फुलांची माळ करावी तशी घरांची माळ बनली.’ त्याला लोक ‘चाळ’ म्हणत. याच चाळीत कदाचित ‘माणूस’ जन्माला आला असावा. या चाळीत प्रत्येकजण इतर दोघांचा (Temporary का असेना पण) ‘मैत्र” असे. नाही म्हणायला रांगेच्या टोकांकडे राहणारे एकेका शेजर्‍यावर ‘भागवत’ असत. याप्रमाणे एकेरी चाळी, दुहेरी चाळी, एक मजली, दुमजली, तीन-चार मजली चाळीही असायच्या. त्या चाळी कच्या बांधणीच्या असल्या तरी चाळकरी मात्र पक्क्या मैत्रधर्मानं बांधलेले असतं. चाळीत कुठं खुट्ट वाजले तरी चाळभर त्याचे पडसाद उमटत. बारशापासून बाराव्यापर्यंतचे सर्व विधी ‘मिळून’सहकार्याने होत. परस्परांच्या अडीअडचणींना सर्वजण वेळी – अवेळी धावून जात. दु:खे वाटून घेत. आणि सुखे वाढवीत. यालाच “माणुसकी” म्हणतात.

शहरंही वाढली, त्यांची महानगरं बनली. वाडे गेले, ‘Complexes’ उभे राहिले. चाळी म्हातार्‍या झाल्या, डुगडुगू लागल्या त्याही गेल्या आणि ‘Colonies’ जन्मल्या, ‘Flat System’ आली. माणसांची रूपांतरं झाली, त्यांच्या घरांची, वाड्या-वस्त्यांची रूपांतरं झाली. याहीपेक्षा या गर्दीत महत्वाची अशी ‘माणुसकी’ हरवली.

“शबर उपर मानुष आछे |

ताहार उपर नाई केऊ |

ही एक बंगाली गीतातली ओळ आहे. त्याचा साधारण मराठी अनुवाद असा : “सार्‍यांहून थोर माणूस आहे, त्याहून थोर कोणीच नाही”. असे म्हणतात की, ते एका ‘बाऊलाने’ लिहिलेले आहे. ‘बाऊल’ ही बंगाल मधील एक जमात आहे. हे ‘बाऊल’ स्वत:ला ‘सहजिया’ पंथाचे अनुयायी म्हणवतात. ‘सहजिया’ म्हणजे सहज, मुक्त, आकांक्षारहित, आनंदमय जीवन जगणारा. हे ‘बाऊल’ सामान्यत: जिप्सीसारखे दिसतात आणि असतातसुद्धा. ते पोटासाठी काही खास व्यवसाय, कामधंदा करत नाहीत. टोळ्या करून ते सर्वत्र हिंडतात. त्यांच्या हातात ‘एकतारा’नावाचे वाद्य असते. बरोबर एखादा पेटीवाला असतो. पेटीच्या सुरवार एकतार्‍याच्या साथीने गाणी गात फिरणे, हा बाऊलांचा आवडता छंद ! ही गाणीही ते स्वत:च रचतात. वर उल्लेखलिले गाणे त्यापैकीच एक आहे.

‘बाऊल’ स्वत:ला ‘ख्यापा’ या नावानेही संबोधतात. ख्यापा म्हणजे वेडा, पागल. बाऊलांची एकूणच जीवनसरणी ध्यानात घेतली, तर हे विशेषण त्यांच्या बाबतीत किती समर्पक आहे हे लक्षात येते. व्यवहार चतुर, धोरणी, शहाण्या जगात हे वेड्यांमध्येच जमा होणारे आहेत. लग्न करावे, संसार थाटावा, पोरबाळांना जन्म द्यावा, पोटासाठी काहीतरी करावे, संपत्तीचा हव्यास धरावा आणि व्यावहारिक अर्थाने यशस्वी जीवन जगावे, ही सर्वसामान्य माणसांची महत्वाकांक्षा असते. ‘बाऊल’ याहून अगदी वेगळे आहेत. ते संपूर्णपणे निरीच्छ, निरहेतुक जीवन जगतात. त्यांचा देव नसतो. त्यांचा धर्म पण नसतो. मन:पूत  स्वच्छंदाने जगणे, हा त्यांचा धर्म आणि अंतर्यामीचा माणूस व ज्यामुळे जपतो ती माणुसकी हाच त्यांचा देव. ‘सार्‍यांहून थोर माणुसकी आहे.’, असे म्हणणारे ‘बाऊल’ त्या हृदयस्थ माणसाला मानतात. आणि आम्ही मनातला माणूस शोधतो, त्याची पुजा करतो असे ते म्हणतात. एका प्रगल्भ अर्थाने हे केवळ माणुसकीचेच उपासक आहेत, असे म्हणाला हवे.

‘बाऊलांचा’ जसा धर्म नाही, तसे त्यांचे कर्मकांडही नाही, मनात आसक्ती नाही, कटुता नाही, दु:ख तर नाहीच नाही. हीच त्यांची नीती, हीच त्यांची रिती. माधव जूलियन आपल्या एका कवितेत म्हणतात.

“सभोवती या प्रचंड हाटी|

शहाणीयांची अलोट दाटी |

गेम बसुनी प्रसूणीवाटी |

क्षणीक व्हावे जरा दीवाणे |”

जगाच्या बाजारात या शहाण्या माणसांची खूप गर्दी आहे.  असो बिचारी ! आपण मात्र प्रसूनवाटीकेत म्हणजे फुलांच्या ताटव्यात बसावे आणि क्षणभर दिवाणे म्हणजे वेडे व्हावे. माधव यांना क्षणभर वेडे व्हावे असे वाटते. ‘बाऊलांनी’ मात्र एका आंतरिक शहानेपणाने हे माणुसकीचे वेडेपण कायमचे पत्करलेले दिसते.

पण आता फक्त असच वाटत की, या अशा वास्तवात हाडामाणसांच्या घोळक्यात ‘Only’ माणूस शोधता येईल पण ‘माणुसकीच’ काय ? मला तर प्रश्नच पडतो की ‘माणुसकी’ ही फक्त शब्दकोषामद्धे तर जमा होणार नाही ना? आणि मग अशा माणूसकीपण हरवलेल्या माणसाच्या मनात एक असामान्य प्रश्न पडतो.

हे अनंतरुपधारिणी, चिद्विलासिनी खर सांग, माझ्यात अस काय पहिलस की ज्याच्यामुळे तुला माझ्या अंगणात उतरावंस वाटलं ? आकाशाचा आशीर्वादच आला माझ्या घरी. या ओळीचा अनुभव देत हा सुखाचा नीळा पक्षी अंगणात उतरतो खरा; फुलराणीचे हे विलसतरू निळी शिडे उभारून येते खरे; पण ते इथच थांबवून ठेवणं जीवनप्रवासाला केवढं अशक्य आहे हे जाणवून माणसांच्या गर्दीतल्या माणुसकीबद्दल प्रश्नचिन्ह उभ राहतं.

अशा एखाद्या क्षणी जगण्याचा अर्थच भोवर्‍यात येतो. वाटचालीत सगळं काही नाट्यप्रयोगासारखं ठरलेलं नसतं; तिथंही अनपेक्षित घटनांच महाजाल एखाद्या वादळक्षणी उभ राहू शकतं, इथं तर प्रत्येक क्षण अनपेक्षित ! सुरळीतपणा हे जिथलं स्वप्न, अगदी अचानक ‘खंजीर अनुभव’ हे इथलं सत्य ! त्या आयुष्यात माणुसकीचा, सोबतीचा हात क्षणभर सुटतोय असं वाटतं.

खरचं मित्रहो, जाणवेल कधीतरी, कुठल्या तरी दिव्य क्षणी जर माणुसकीचा हात हातात आलाच नसता  किंवा चुटपुटती चुकामुकच झाली असती तर मी आज कोण – कुठे – कसं असतो याची साधी कल्पनाही तुम्ही त्यावेळी करू शकणार नाही.

वाटतं हा वरवरचा वर्ख, काहीही खरं नाही, सावल्यांचे तंबू – ऊन कलल्यावर उठून जातात अन आपण  आणि आयुष्य असे थेट समोरासमोर उभे राहतो. आयुष्याचं ‘धो धस्स कोंडूररूप’ रुद्रभीषण विरटासारखं समोर येतं.कादंबरीतले खानोलकर आरती प्रभूच्या रूपात विचारतात त्यांचा – तुमचा – माझा सर्वाचा प्रश्न –

“कशासाठी – कुणासाठी – कुठे आणि कुठवर ?

रेटायचा ऐसा गाडा, ईमानाने जन्मभर ?

प्रश्न ! प्रश्न ! प्रश्न ! उत्तराविना पोरका हा प्रश्न आर्त करते. जे करतोय – जगतोय – त्याच पुढे काय ? हा प्रश्न सलत राहतो.केवळ श्वासांना देहाच्या धर्मशाळेत जोवर थांबवसं वाटतंय तोपर्यंत थांबू द्यायचं म्हणजे जीवन का ?

चार लोक आपल्याला ओळखतात. हसून जवळ येतात; कौतुकाची चार फुलं हाती देतात. टाळ्यांचा वसंत हाती देत निराळेपण अधोरेखित करतात. हे सारं एकत्र करून, चुरगळून पुरचुंडी करून कोपर्‍यात ठेवलं तर आयुष्याच्या तळाशी काय उरतं ? असा प्रश्न मनात तलवारीसारखा उगवतो. अशावेळी संध्याकाळची झुळूक होऊन माणुसकीचा हातच आपल्याला जवळ घेतो. शिणलेली मान खांद्यावर ठेवून डोकं थोपटतो म्हणतो –

          “हे सगळं निमित्त रे, हे खरं जगणं नव्हेच, आपण जगतो आहोत वर्तमानातले सारे ऊर्जा स्त्रोत उमगणं म्हणजे जगणं.

          या केवळ खिडक्या …..

          आकाश….त्या पलीकडे…..त्याही पलीकडे

          एका सजीव स्पंदनशील म्युझियममध्ये नियतीने आपल्याला पाठवले आहे. ती स्पंदनं टिपून घे. मग बघ तुझ्या ध्यासाला काही वेगळाच अर्थ येईल.”

आणि मग आपला एक अर्जुनकप्पा उघडेल. विश्वरूप दर्शनाचा आवाका आपल्यासारख्यांना शत जन्मात पण शक्य नसतो, पण संकुचिततेने विश्वाचे मिटून घेतलेले दरवाजे प्राणपणाने उघडू लागेल, धक्का बसेल, कोसळून जाऊ – असं अनपेक्षित जग समोर ठेवते ती – “माणुसकी”.

मग कळतं हे जग केवळ मुलाफुलांचं नसतं, वार्‍यापावसाचं नसतं – हे जग असतं नीखार्‍याचं, वचनाचं, उपेक्षांचं, जखमांचं, माणसानं निर्माण केलेल्या भुकेच्या काहुरीचं, शोषणाचं, धर्मांधतेचं, जग उध्वस्त करणार्‍या पाशवी इच्छेचं – हे जग भयंकर असतं – हे स्वीकारून यासाठीही काही करण्याच्या आदिम महत्वाकांक्षेचा, माणुसकीचा पलिता त्यातून उजळेल अशी अपेक्षा आहे !

केवळ एकच पाहून ‘व्यक्त’ होण्यापेक्षा अनुभवांचे सारे झरोके मोकळे ठेवायला माणुसकीच सांगते. आता ‘सांगण्याचे’ प्रयोजन बदलते. नुसते नादावणे उरत नाही. होता होईल तेवढा आपल्या बळानिशी पलिता जागवण हेही प्रयोजन ठरतं.

मग वाटेलच नक्की, या माणुसकीण वाटांना नव्या वाटा दिल्या, काळोखातुन पुन्हा नव्या ऊर्जेचा स्रोत देणार्‍या माणुसकीच्या करुणेसाठी अवघी मानवजात ऋणी राहील.

          मित्रहो

                              मी,

                                           त्या समुद्रातला

                                                                     एक  नगण्य थेंब !

आणि अजूनही मी, या दिवसेंदिवस मुके राहणार्‍या कागदांवर शब्दसंजीवणीचे चार शिंतोडे फेकतोय,

पण का कुणास ठाऊक, “माणसांच्या गर्दीत अजूनही माणूस शोधतोय मी, माणसांच्या गर्दीत अजूनही माणूस शोधतोय मी…..!”

 

– एक क्षितीज

– कपिलराज नांगरे

One comment

  1. It’s awesome ..
    Very nice 👍🏻

    Best of luck.

    भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…💐💐💐

Leave a Reply

%d bloggers like this: