“भारतमातेसाठी इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमुचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकुन जगाला दाखवून देईन की, क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी केवढ्या धीराने बलिदान देतात.”
हे शब्द आहेत, आपली क्षमता ओळखून, कर्तव्याप्रती निर्भयपणे, चिकाटीने आणि उत्कट भावनेने आत्मविश्वासाच्या बळावर देशासाठी बलिदान देणार्या शहीद भगतसिंग यांचे आणि तेव्हाचे आहेत जेव्हा त्यांना व त्यांच्या सहकार्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि ते शहीद होण्यासाठी उतावीळ झाले होते. शहीद भगतसिंग खरे तर युवकांसाठी समृद्धीचे कारखानाच आहेत आणि तो निर्मिताना प्रदूषण वाढवणार्या अविचारांची काजळी माझ्या तरुण युवकांना लागू नये म्हणून त्यांनी समृद्ध विचारांची रोपे लावली. भगतसिंग हे समाजवादी, वामपंथी (कम्युनिस्ट) आणि मार्क्सवादी विचारांचे अनुयायी होते. अमृतसर मध्ये १३ एप्रिल १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड ने त्यांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकला आणि लाहोर मधल्या नॅशनल कॉलेज चे शिक्षण सोडून त्यांनी, नौजवान भारत सभा ची स्थापना केली. त्यांच्या या संघटनेच उद्दीष्ट एकच होत आणि ते म्हणजे सेवा, त्याग आणि वेदना सहन करू शकणारे नवयुवक तयार करणे.
म्हणून तर आजही श.भगतसिंग हे युवकांचे दीपस्तंभ आहेत. तब्बल दोन वर्ष ते तुरुंगवासात होते, दरम्यानच्या काळात त्यांनी खूप क्रांतिकारी लेख लिहिले, तसेच अनेक आप्तेष्टांना पत्रही लिहिली त्यातून जे त्यांनी विचार मांडले ते आजच्या पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक तर आहेतच शिवाय त्यांचे विचार हे त्यांचा आरसाच आहेत हे दर्शवते.
“एकमेकांना पराभूत करण्यात शक्ति खर्च करण्यापेक्षा
एकमेकांच्या शक्तीच्या बळावर सार्यांनाच विजयी होता येतं…!”
हा यशस्वी क्रियाशीलतेचा मूलमंत्र श.भागतसिंग यांनी आपल्या कार्यातून युवपिढीला दिलाय. सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात हे त्यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी भर सभेत बॉम्ब फेकून सिद्ध केल. या घटनेतून श.भगतसिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जे तरुण युवकांना मार्गदर्शक ठरतील असे आपल्याला पाहायला मिळतील. ते असे की, भगतसिंग खरे तर रक्तपाताच्या विरोधातच होते, परंतु वामपंथी विचारांचे अनुयायी होते तसेच कार्ल मार्क्स च्या सिद्धांताने प्रभावित झाले होते. हेच नव्हे तर ते समाजवादाचा आदरही करत होते. म्हणूनच तर भांडवलदारांच्या श्रमिकांच्या विरोधातील शोषणाचे धोरण त्यांना पटले नाही. त्यावेळी इंग्रजांची सत्ता असल्यामुळे आणि जास्त उन्नती न करू शकणारे भारतीय उद्योजक वर्ग या दोन गोष्टींमुळे भगतसिंग यांचा विरोध हा स्वाभाविकच होता. ब्रिटिश संसदेत अशी विरोधी कामगार धोरणे न पाळण्याचा तो निर्णय होता. आणि म्हणूनच इंग्रजांना हे कळणे गरजेचे होते की भारतीय जनता आता जागी झाली आहे आणि भारतीयांच्या मनात अशा धोरणांविरोधात आक्रोश आहे. आणि हे इंग्रजांना दाखवून देण्यासाठी भगतसिंग व त्यांच्या सहकार्यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकण्याची योजना आखली. भगतसिंग यांना त्या बॉम्ब हल्ल्यात रक्तपात नको होता, फक्त आपला आवाज इंग्रजांपर्यंत पोहचावा हा एकमात्र त्यांचा उद्येष्य होता. म्हणूनच तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी एकाचवेळी अशा ठिकाणी बॉम्ब फेकला जिथे कोणीही मनुष्य नव्हता. संपूर्ण सभागृह धूराने भरला होता त्या धूरात हवे असते तर भगतसिंग पळूनही जाऊ शकले असते पण त्यांनी आधीच विचार पक्का केला होता की, त्यांना शिक्षा स्वीकार आहे आणि त्यासाठी त्यांना फाशी जरी सुनावण्यात आली तरी बेहत्तर ! शेवटी त्यांनी पळून जाण्यास नकार दिला. या गोष्टीवरून असे लक्षात येते की त्यांनी त्यांच्या अहिंसक विचारांना, हिंसक प्रकारे जरी प्रकट केले तरी कोणत्याही जिवाची हत्या न करता एका स्तंभासारखे ते न्यायासाठी लढले आणि प्रामाणिकपणे शिक्षेस सामोरे गेले. कारावासात असताना सुद्धा कधी रिकामा वेळ मिळाला तर भगतसिंग हे रायप्रसाद बिस्मिल्ला यांचे ‘मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे…’ मोठ्या तन्मयतेने म्हणत. त्यामुळे राजकैद्यांमध्ये देशाप्रती निष्ठा व स्वाभिमान वाढीस लागे. भगतसिंग यांच्या कार्याने, विचाराने आणि बलिदानाने तरुण पिढीला हा संदेश दिलाय की, बुद्धी आणि इंद्रिय यांच्यापलीकडे एक शक्ति असते, ती अंत:प्रज्ञा ! तीच अंत:प्रेरणा आपल्यात जागवत राहते. ही शक्ति प्रत्येकातच असते. गरज असते, ती या प्रज्ञेचा वापर करण्याची ! मात्र आपल्यात असलेल्या प्रज्ञेचा – शक्तीचा, शोधच आपल्या आजच्या युवा पिढीला लागत नाहीये ही शोकांतिका आहे. त्यामुळेच युवा वर्ग हा आहे तिथेच आहे; आहे त्या परिस्थितीत अडकून आहे. खरंच , भगतसिंग यांचे व्यक्तिमत्व दीपस्तंभारखेच आहे, हे जर युवा वर्गाने हेरले तर या प्रज्ञेचा वापर करून आपल्या अवतीभवतीचा, आपल्या जगण्याचा, परिस्थितीचा, समाजाचा, राष्ट्राचा, उद्भवणार्या समस्या प्रश्नांचा वेध घेत, स्वत:च्या जाणिवा प्रगल्भ करत काही शोधण्याची – मिळवण्याची प्रक्रिया चिंतनातून – विचारातून गतिमान होईल यात तीळमात्र शंका नाही.
म्हणूनच मित्रांनो, ‘कर्तव्याला विसरणारी माणसं, ही कर्तबगार होऊच शकत नाहीत तसेच क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की, योग्यता मिळवता येते आणि क्षमता जाणीवपूर्वक घडवता, वाढवता येते.’ हे सिद्ध होते श.भगतसिंग यांच्या कर्तुत्वप्रणालीतून. धगधगते अंगार होते भगतसिंग ! आपल्या आईला (बेबेजी) म्हणत, “फाशी झाल्यावर तू माझं शव घ्यायला येऊ नको, कुलबीरला पाठव, कारण तू रडायला लागली तर लोक म्हणतील, भगतसिंगची आई रडत आहे”. अहो, किती हे देशप्रेम ? यालाच तर म्हणतात आपल्यातल्या दुबळ्या जागांचा विकास करणे आणि तो विकास करण्यासाठी आपल्यातील सामर्थ्य, शक्तीस्थाने कोणती, दुबळी स्थाने कोणती हे कळण्याची दृष्टी असणे.
“भिणार्यांना कुणीही भीती घालतं…
निर्भयापुढे मात्र जग झुकतं…!”
हीच पंक्ति निर्भीड अशा भगतसिंग यांना उदयेशून मला सांगावीशी वाटतात, अहो या निधड्या छातीच्या वाघाच्या महान क्रांतिकार्याची गाथा ऐकून रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी भगतसिंग यांना मास्कोला येण्याचे निमंत्रण दिले होते. कदाचित स्टॅलिन यांना वाटलं असेल,“ध्येय हाच श्वास नि ध्यास झाल्याने भगतसिंग यांच्या अंगी जणू झपाटलेपण आलं असावं ! ध्येयाच्या दिशेने पडणारं भगतसिंग यांचं प्रत्येक कृतियुक्त पाऊल त्यांना यशाच्या जवळ घेऊन जात आहे.”
फाशीच्या आधी तुम्हाला काही शेवटी सांगायचं आहे का? असं मॅजिस्ट्रेटने विचारले असता, भगतसिंग म्हणाले “क्रांती ये मानव का निसर्गदत्त हक है ! तो, आझादी ये उसका जन्मसिद्ध हक है ! आझादी और जिंदगी एक बात है ! तो गुलामी और मौत एक बात है|” हाच अखेरचा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ते म्हणाले,“मॅजिस्ट्रेट महोदय तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे की, भारतीय क्रांतीकारक आपल्या सर्वोच्च आदर्शासाठी मृत्युचं स्वागत कसं करतात.” मित्रहो, नवनिर्मितीचा सार्थ आनंद समाधानाची शांतता बहाल तर करतोच तितकीच नव्या जबदारीची जाण देत वैश्विक कल्याणाच्या ध्येयसिद्धीचही भानही देतो आणि त्यातूनच आपण उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च असे घडतो. हाच संदेश भगतसिंग युवकांना उदयेशून सांगताना आढळतात.
फाशीच्या आधी ३ मार्चला भगतसिंग यांनी आपल्या भावास जे पत्र लिहिले होते, त्यातील उत्साही ओळींवरून आपण त्यांच्या शौर्याचा अंदाजही सहज लाऊ शकतो आणि खूप काही शिकून आचरणात आणू शकतो, ते त्या पत्रात म्हणतात म्हणतात,
उन्हें यह फ़िक्र है हरदम, नयी तर्ज़-ए-ज़फ़ा क्या है?
हमें यह शौक है देखें, सितम की इन्तहा क्या है?दहर से क्यों ख़फ़ा रहें, चर्ख का क्या ग़िला करें।
सारा जहाँ अदू सही, आओ! मुक़ाबला करें।।
२३ मार्च १९३१ हा अमर दिवस उजाडला. तिघांना फाशी होणार म्हणून सारं राष्ट्र व्याकुळ झालं होतं. उजव्या बाजूला सुखदेव तर डाव्या बाजूला राजगुरु आणि भगतसिंग मधोमध उभे. त्यांच्यात प्रथम कोणी फासावर चढायचं, याबाबत प्रेमकलह होता. शेवटी आपसात तडजोड करुन सुखदेव, भगतसिंग आणि मग राजगुरु अशा क्रमाने फासावर चढण्याचं ठरलं. शेवटी भगतसिंग जे म्हणाले ते म्हणाले सर्व भारतीय युवकांना अतिशय प्रेरणादायी आणि खरंच दीपस्तंभासारखेच बोल आहेत,
“दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उलफत !
मेरी मिट्टी से खुशबू–ए–वतन आएगी”
आणि मृत्युकडे नेणार्या फासाचं त्यांनी चुंबन घेतलं !