नमस्कार ! मी तुम्हा सर्वांचा भाऊ. असं म्हणतात की, एका विचारानं अनेक विचारांचा सोहळा निर्माण होण्यास सुरुवात होते. ‘मी एकटाच’ मला भाऊ नाही आणि बहीणही नाही, म्हणूनच बहुतेक म्हणतात वाटतं, ‘अस्तित्वाची किंमत हि तीच अस्तित्व नसतानाच कळते’, त्यामुळेच कदाचित मला ‘बहिणीचे’ महत्व उमजते आहे, तिची उणीव भासते आहे. मग तुमच्यासारख्या बहिणीची दुर्बल अवस्था पाहून मला माझे हात लेखणीपासुन लांबवता आले नाहीत.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्त्री जन्माबद्दल एक सुंदर आख्यायिका सांगितले जाते. कोणी एक लेखक म्हणतो, “नारी देह जा अत्यंत दुर्मिळ आहे, एकशे सात मणी फिरल्यावर एकशे आठवा मणी मेरुमणी असतो. त्याचप्रमाणे काळ चौऱ्याऐंशी लक्ष मण्यांची माळ घेऊन बसला आहे, त्यात नारीदेह हा मेरूमणी आहे. सप्तरंगांची उधळण करणाऱ्या इंद्रधानुष्यातले सात रंग एकत्र आले अन सोज्वळता व सोशीकपणाचा अभ्युदय झाला ! या विश्वातल्या सप्तरंगाचा, सप्तगुणांचा, दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य, पावित्र्य अन मांगल्याचा संगम झाला आणि “स्त्री” ने जन्म घेतला.” तर सांगण्याचा हेतु काय, तर या जनमासाठी तुम्ही परमेश्वराचे आभार तर मानले पाहिजेतच पण त्याचबरोबर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. तुमच्याकडे चिद्विलासिनी, मनमोहिनी अशी शरीरयष्टी आहे यात तीळमात्र शंका नाही पण तुमचं वागणं अगदी मिळमिळीत आहे ही चिंतेची बाब आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मुलगी ही जितकी दिसला सुंदर तितके काटे तिच्या पायात जास्त, मग “काटे वेचून वेचून वेचणार तरी किती?” यापेक्षा आपणच पायात चप्पल घातली तर पायाला काटे बोचणारच कसे? म्हणूनच म्हणतो,
“येणार्या दिवसांसाठी तयारीत रहा,
त्यांना सारखेच सामोरे जा,
जेव्हा ऐरण व्हाल तेव्हा घाव सोसा,
अन हातोडा व्हाल तेव्हा घाव घाला”
अहो मुलगी ही ‘अग्नि’ स्वरूप आहे तर मुले थिजलेल्या तुपासारखी, जर का थिजेलले तूप अग्नीच्या संपर्कात आले तर ते वितळायलाच हवे. पण तुम्ही शांत राहून त्रास सहन करून त्यांची कृत्ये करण्यास प्रोत्साहन देताय हे तुम्हाला का लक्षात येत नाही ? प्रत्येकवेळी भावाची साथ मिळेलच अस नाही. यासाठी तुम्ही self-dependent झालं पाहिजे.
अहो माणसाचं मन चंचल आहे. अहंकार व परस्त्री अभिलाषा हे महाबलशाली विकार, महान ज्ञानी असलेल्या महात्म्यालासुद्धा शून्य करू शकतात, विश्वमित्रऋषींचे उदाहरण आपल्या परिचयाचे आहेच, तर मग ही भामटी मुलं काय टिकतील हो ? काय पटतंय ना ? तळहाताला आलेल्या फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्या आईबाबांसाठी आपण फक्त आपल्या व्यक्तिमत्वात कणखरपणा आणू शकत नाही ही फार लज्जास्पद बाब आहे. माझे गुरु, म्हणजे ते ज्यांना मी मनापासून पूजनीय मानतो ते म्हणतात, “यौवनावस्था मनुष्याला अमर्याद बनवते, धर्मांच्या, नियतीच्या मर्यादा ओलांडण्याचा मोह तारुण्य भाग पाडते. म्हणून हा काळ जपावाच लागतो. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते तशी आपली परमार्थिक उन्नतीही आपल्या नकळतच झाली पाहिजे”, हे तुमच्या का लक्षात येत नाही ? अहो, ‘आभाळ कवेत घेण्यासाठी आभाळएवढं मन हवच’ नाहीतर काय मग –
“मन वढाय वढाय | उभ्या पिकातलं ढोर ||
किती हाकलं हाकलं | फिरी येतं पिकावर ||”
या बहिणाबाईंच्या ओवीप्रमाणे ती भामटी मुले कशाचीही तमा न बाळगता तुमच्यासारख्या मुल्लींना त्रास देणारच, काय बरोबर ना ? silence is golden म्हणजे ‘मौनम् सर्वार्थ साधनं’ हे माहितीय पण योग्य वेळी मुख हे उघडलेच पाहिजे. अहो, कदाचित तुमच्या बोलण्याने त्या मुलामध्ये परिवर्तन घडू शकते, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होऊ शकते, त्याला त्याच्या मर्यादांची सीमा कळेल, त्याला त्याच्या जबाबदार्यांची जाणीव होईल.
तर मग थोडा विचार करा या भावाच्या बोलण्याचा, नक्कीच तुमच्यात परिवर्तन घडेल अशी आशा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा ‘आकारे न रंगती चेष्टा’ म्हणजे मनुष्याच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या हातून घडणार्या कृतीचे स्वरूप सांगता येत नाही. शेवटी एवढेच म्हणेन –
“काळजी नको, क्षोभ नको, खंत नको |
संधीची नुकतीच सुरुवात आहे ||
अजून सर्वोत्तम ते सुरू व्हायचे आहे |
अजून सर्वोत्तम ते केलेले नाही ||
तेच तुम्ही हाती घ्या |
सारे आकाश पालथे घाला ||
यशस्वी व्हा, विजयी व्हा |
तुमचं अस्तित्व सिद्ध करा ||”