एक क्षितीज
एक क्षितीजमय विचारधारा आणि एक नवीन सुरुवात
बालपण,तरुणपण,वार्धक्य या बिनचाकाच्या पण तितक्याच वेगवान गाडीमधला प्रवास म्हणजे “संपूर्ण आयुष्य”….! ही आयुष्याची गाडी आपल्यासोबत अनेक भावनांच्या प्रवाशी लोकांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करत असते. रखरखत ऊन असो वा वळवाचा पाऊस या भावनांना सुखरूप आपल्या ठिकाणी पोहचवण्याचे काम हे जीवन करत असते. या प्रवासाच्या दरम्यान सगळ्यात महत्वाची भूमिका बजवतो तो म्हणजे “आपुलकी” नावाचा “कंडक्टर”. आणि या “कंडक्टर” ची व्यापकता सिद्ध करतात ते “तिकिटरूपी शब्द”.
या शब्दांची किम्मत ही आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या स्वरुपात बदलते.ह्याच शब्दांच्या किमयेतून मी साकारत आहे तरुणाईच्या मनातील नवीन क्षितिजे.व्यक्त आणि अव्यक्त, बोल आणि अबोल भावनांचा संगम साधून विविध दृष्टांताद्वारे आपल्या आयुष्यातील अंतरंगाचे धन प्रकाशित करून जीवनातील सौंदर्याचे एकापेक्षा एक अनोखे नमुने सादर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
लेखका बद्दल
“एक क्षितिज” या नावाने आपले स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख करून देणारा हे कपिलराज रमेशकुमार नांगरे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या यांचे कुटुंब तसे बघायला गेले तर सर्वसामान्य, मध्यमवर्गीय विचारांशी तारतम्यता बाळगून राहणारे. पण जगणं शिकले ते आईने त्याच्यासाठी घेतलेल्या मेहनतीतून. मग त्यानंतर प्रत्येक बारीक सारिक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोण बदलला.
समाज, शिक्षण, नाती, मैत्री, राजकारण यांबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह मनात असल्या कारणाने त्या प्रश्नांचा दूरगामी विचारसरणीच्या लोकांकडून उत्तरे घेण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही चालूच आहे पण ती शोधत असताना डोक्यात जे विचारांचं द्वंद्व निर्माण होत गेले अन त्यातून जे निष्कर्ष बांधले गेले त्यातूनच “एक क्षितिज” ची मुहुर्तमेढ रोवली गेली.
मग विविध वर्तमान पत्रातून तसेच लेखन स्पर्धेतून ही विचारांची शृंखला विस्तारतच जात आहे. पण आज एकत्रितपणे पाहताना अस लक्षात येते की, अजाणतेपणी या सर्वांतून त्यांच्याकडून साहित्याचा एक सामग्र धांडोळा घेतला गेला आहे. शब्दांच्या माध्यमातून अर्थछटांच भान राखून विविध भावविश्वान्ना स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.